कर्करोगाला प्रतिरोध करणारे औषध विकसित
- वृत्तसंस्था
Friday, June 15, 2012 AT 02:45 AM (IST)
Tags: carner, medicin, agrowon,
अमेरिकेतील मॉफिट्ट कर्करोग संस्थेतील संशोधकांनी कर्करोगाला प्रतिरोध करणारे कृत्रिम औषध विकसित केले असून, त्याच्या प्रयोगशाळेतील चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. माणसांमध्ये आढळून येणाऱ्या कर्करोगाला कारणीभूत असलेल्या पॅपिलोमा व्हायरस या विषाणूला कार्यक्षमपणे नष्ट करण्यामध्ये हे औषध मोलाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी उंदरांवर केलेल्या चाचण्यांमध्ये आढळले आहे. हे संशोधन "कॅन्सर इम्युनॉलॉजी व इम्युनोथेरपी' या संशोधन पत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
कर्करोगासाठी सध्या वापरात असलेल्या उपचारप्रणालीचे साइड इफेक्ट आणि पुढच्या टप्प्यातील कर्करोगाला रोखण्यात येणाऱ्या अक्षमतेमुळे कर्करोगावर औषधांचा पर्याय मोलाचा ठरणार आहे. मॉफिट्ट संस्थेच्या प्रतिकारकता प्रकल्पाच्या मुख्य सदस्या डॉ. इस्टनबॅन केलीस यांनी सांगितले, की ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) हा कर्व्हिकल कॅन्सरसाठी कारणीभूत ठरत असल्याचे मानले जाते. जगभरामध्ये प्रति वर्ष सुमारे 2.5 लाखांपेक्षा अधिक मृत्यूंसाठी तो कारणीभूत ठरतो
अशी आहे औषधप्रणाली
सध्या दोन प्रोफायलॅक्टिक औषधे "एचपीव्ही'ला रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरली जातात. मात्र, त्यांचा वापर कर्करोग झाल्यानंतर फारसा उपयुक्त ठरत नाही, त्यामुळे कर्करोगाच्या नियंत्रणासाठी मॉफिट्ट संस्थेमध्ये संशोधन करण्यात आले. त्यामध्ये केलीस आणि दक्षिण फ्लोरिडा विद्यापीठातील केली बोरीस - मारूगो यांनी पेपटाईड व्हक्सीनेशन स्ट्रॅटेजी विकसित केली असून, तिला ट्राय व्हॅक्स - एचपीव्ही असे म्हटले जाते. त्याद्वारे "एचपीव्ही - इ 6' व "इ 7' या कर्करोगांसाठी कारणीभूत ठरणाऱ्या प्रथिनांना रोखण्यात येते. या संशोधनातून लवकरच अधिक कार्यक्षम आणि साइड इफेक्ट नसलेली औषधप्रणाली विकसित होणार असून, "एचपीव्ही'मुळे होणाऱ्या कर्करोगाला रोखण्यात मदत मिळणार आहे.